Tuesday, August 19, 2008

एक प्रवास... कधीही न संपणारा... 2 about Banker to the poor!

हा कालचा म.टा. तला लेख:
दुवा: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3374519.cms

जॉन कोलासो

स्वयंरोजगारासाठी तारणाशिवाय छोट्या रकमेची कर्जे दिल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्येचाही प्रश्न सुटू शकेल, असा विचार आता बळावू लागला आहे!
*********
बँकिंग क्षेत्रात सध्या बदल घडत आहेत. त्यामध्ये महत्त्वाचा बदल म्हणजे 'बँकिंग द अनबँक' असे नवे सूत्र अमलात येत आहे. त्यामुळे यापूवीर् उपेक्षित राहिलेल्या गरीब, दरिदी वर्गाला, विशेषत: ज्यांच्याकडे कर्ज घेण्यासाठी तारण नाही, अशा महिलांकडे बँका आता लक्ष देऊ लागल्या आहेत. अर्थात या नव्या संकल्पनेचे निर्माते आहेत नोबेल पुरस्कार विजेते आणि बांगला देशातील ग्रामीण बँकेचे संस्थापक प्रा. महमद युनुस.

बँका नेहमी ज्यांच्याकडे कर्ज घेण्यासाठी तारण आहे, म्हणजे कोणत्यातरी स्वरूपात मालमत्ता आहे, म्हणजे श्रीमंतांनाच कर्ज देतात. कारण, यामागे त्यांची संकल्पना अशी आहे की, कर्जदाराने कर्ज फेडले नाही तर त्याची मालमत्ता ताब्यात घेता येते. बँका आपली सोय पाहून कर्ज देत असल्यातरी, प्रत्यक्षात मालमत्ता तारण ठेवूनही कर्ज बुडविणाऱ्या कर्जदारांची संख्या मोठी आहे. कर्ज घेऊन ते प्रामाणिकपणे फेडण्याची प्रवृत्ती असणाऱ्या गरीब, निराधारांना, विशेषत: महिलांना कर्ज देण्याआड बँकांचे नियम आड येतात. या नियमांनाच आड करून दारिद्यात खितपत असलेल्या महिलांना कर्ज दिल्यास कर्जपरतफेडीचे प्रमाण ९८ टक्के राहते, असे सप्रमाण प्रा. युनुस यांनी 'ग्रामीण बँके'च्या माध्यमातून सर्व जगाला दाखवून दिले. इतकेच नव्हे तर आतापर्यंतच्या सर्व अर्थशास्त्रज्ञांनी बेकारी हटविण्यासाठी रोजगारनिमिर्तीवर म्हणजे नोकऱ्यांवर भर दिला आहे, स्वयंरोजगाराकडे दुर्लक्ष केले आहे, ही चूकही दाखवून दिली आहे.

अत्यंत गरीब महिलांना स्वयंरोजगारासाठी सूक्ष्म पतपुरवठा करण्याच्या या यशस्वी प्रयोगाची माहिती प्रा. युनुस यांनी 'बँकर टू द पुअर' या त्यांच्या आत्मचरित्रात दिली आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रा. शरद पाटील यांनी 'बँक गरिबाच्या दारात' नावाने उत्तमरीत्या केला आहे.

स्वयंरोजगाराद्वारे पोट भरणाऱ्या दरिदी वर्गाला कर्ज मंजूर करण्यास बँक व्यवस्थापकाने नकार दिल्याने प्रा. युनुस यांचा त्याच्याशी वाद झाला. या वादाची झलक पुस्तकात देण्यात आली आहे.

प्रा. युनुस यांनी या अधिकाऱ्यास सांगितले की, ''तुम्हाला कर्जाऊ दिलेले पैसे परत येण्याशी तुमचा संबंध आहे, जर पैसे परत मिळणार असतील तर तुम्हाला तारणाची जरुरी काय?''

'' अर्थात आमचे पैसे आम्हास परत मिळाले पाहिजेत, त्याचबरोबर आम्हाला तारणाची आवश्यकता आहे, कारण ते आमचे पैसे परत मिळण्याची हमी असते.''

'' मला तुमच्या म्हणण्याचा अर्थ कळत नाही. ते अत्यंत दरिदी लोक रोज बारा तास काम करतात, त्यांना पोट भरण्यासाठी व्यवसाय करून पैसा मिळवावा लागतो. तुमचे पैसे परत देण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही, कारण पुन्हा तुमच्याकडून त्यांना पैसे हवे आहेत. ते मिळाले नाहीत तर ते जगू शकत नाहीत आणि हेच तुमचं सर्वात उत्तम तारण आहे, त्यांचे जीवन.''

'' प्राध्यापकसाहेब, तुम्ही आदर्शवादी आहात. तुम्ही पुस्तकांच्या आणि सिद्धांताच्या जगात वावरता.''

'' जर तुमचे पैसे परत मिळणार असतील, तर तुम्हाला तारणाची गरज काय?''

'' तो आमचा नियम आहे.''

तर असा बँकिंग नियम प्रा. युनुस यांनी बदलण्यास बँकांना भाग पाडले. दारिद्यात जीवन कंठणाऱ्यांना विशेषत: महिलांना स्वयंरोजगारासाठी छोट्या रकमेचे कर्ज दिले तर त्याद्वारे या महिला आपल्या कुटुंबास दारिद्यातून बाहेर काढतात आणि त्याचवेळी कर्जाची परतफेड प्रामाणिकपणे करतात. त्यांच्या या सिद्धांतास पूरक असा लेख एचएसबीसी इंडिया बँकेच्या सीईओ नैना लाल किडवाई यांनी 'इकॉनॉमिक टाइम्स'मध्ये लिहिला आहे. 'फिनॅन्शियल इन्क्ल्युजन अँड डेमोक्रॅसी' या शीर्षकाखालील लेखात त्यांनी 'बँकिंग द अनबँक' सूत्र मांडले आहे.

किडवाई यांनी म्हटले आहे की, अर्थसाह्यापासून आतापर्यंत वंचित राहिलेल्या वर्गाला संघटित वित्तीय यंत्रणेचे भाग बनविणे आवश्यक आहे. असे केल्याने या वर्गाला मिळणाऱ्या फायद्याची माहिती करून देणे आवश्यक आहे. अर्थसाह्य मिळणाऱ्या वर्गात त्यांचा सहभाग झाला म्हणजे आथिर्क विकासाचा कार्यविस्तार अशा उपेक्षित वर्गापर्यंत पोचेल. त्यांच्याकडे अधिक पैसा आला म्हणजे तेही बचत करतील आणि ही बचत बँकेकडेच जाईल, परिणामी बँकेकडेच्या ठेवी वाढतील, त्यामुळे बँकांना उत्पादनासाठी अधिक अर्थसाह्य करणे शक्य होईल व त्याच बरोबर अथिर्क विकास साधण्यास मदत होईल.

यासंबंधी किडवाई यांनी गुजरातमधील गौरीबेन या महिलेचे उदाहरण दिले आहे. दारिद्य व उपेक्षित कुटुंबात असलेली ही महिला यापूवीर् नवऱ्याची पत्नी व पुढे मुलांची आई म्हणून ओळखली जात असे. परंतु, तिला बँकेचा हात मिळाला, स्वयंरोजगारामुळे चार पैसे मिळवू लागली आणि आज ती 'गौरीबेन' नावाने ओळखू लागली आहे, तिला स्वत:ची ओळख देण्यासाठी दुसऱ्याची गरज लागत नाही!

हाच धागा पकडून किडवाई यांनी या लेखात म्हटले आहे की, देशभर होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे मुख्य कारण म्हणजे त्यांना कमी व्याजदराने कर्ज न मिळणे हे होय. ग्रामीण भागात अद्यापही सावकरांचे वर्चस्व आहे, तर नाहक तरतुदी आणि कर्जवसुलीची अडचणीच्या जंजाळात बँका अडकलेल्या आहेत. यातून मार्ग काढणे आवश्यक आहे.

किडवाई यांच्या प्रमाणे सर्व बँकप्रमुखांनी आथिर्कदृष्ट्या मागासलेल्या वर्गाला स्वयंरोजगारनिमिर्तीसाठी छोटी छोटी कर्ज मंजूर करण्याचा विधायक दृष्टिकोन स्वीकारला तर देशातील गरिबी नष्ट होण्यास वेळ लागणार नाही.

"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.

No comments: